Baba Amte information in Marathi language.

Baba Amte Information in Marathi Language – बाबा आमटे हे एक थोर समाजसेवक आहेत. त्यांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे आहे. बाबा आमटे यांचे समाजकार्य संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. तर चला मग पाहूया त्यांच्या विषयी माहिती.

जन्म

बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर, 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंघणघाट येथे झाला. बाबांचे कुटुंब त्या भागातील जमीनदार कुटुंब होते. त्यांची ही श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती. बाबांचे लहानपणही अतिशय श्रीमंतीत गेले. बाबांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची बंदूक होती आणि ते हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे, बाबांच्या कुटुंबाची स्थिती खूप आरामदायक होती.

बालपण

बाबा आमटे यांचे बालपण खूप आरामदायक गेले. कारण त्यांची जन्मता श्रीमंती होती. तसेच लहानपणापासून त्यांना समाजसेवा हा गुण जडलेला होता. बाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. इंग्रजी चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे होते. अनेक नियतकालिकांसाठी ते त्या काळी चित्रपटांचे परीक्षण लिहित असत. ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता.

पुढे बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले, तेव्हा त्यांच्या कामात पहिली मदत नोर्मा शेअरर हिचीच मिळाली होती. बाबांना लहानपणी कार चालवणे शिकले तेव्हा एक स्वतंत्र स्पोर्ट्स कार देण्यात आली. पण बाबा लहानपणापासून स्वतंत्र विचारांचे होते. बालपण ऐश्वर्यात गेले असले तरी त्या वयातही त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. त्यांचे मित्र खालच्या जातीचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या सोबत खेळण्यास मनाई होती किंवा बंधने घालण्यात येत होते. परंतु या बंधनांचा बाबांवर कोणताही खूप परिणाम होत नसे व ते आपल्या मित्रांसोबत मिळून मिसळून खेळत असत.

जीवन

बाबांनी आपल्या कॉलेजच्या दिवसात संपूर्ण भारत फिरले. रवींद्रनाथ टागोरांच्या संगीत आणि कवितांनी प्रभावित झालेल्या बाबांनी त्यांच्या शांतीनिकेतनलाही भेट दिली. टागोरांचा बाबांवर बराच प्रभाव होता. तितकाच प्रभाव वर्ध्याजवळच सेवाग्राम येथे आश्रम असलेल्या महात्मा गांधींचाही होता. मार्क्स व माओ यांच्या विचारांनीही बाबांना आकर्षिले होते. पण त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी रशिया व चीन या दोन्ही देशातील क्रांती मात्र त्यांना आवडली नाही. साने गुरूजींचाही बाबांवर बराच प्रभाव पडला होता.

अशा वातवरणातूनच मोठे झालेल्या बाबांनी वरोरा येथे वकिली सुरू केली. ती दणकून चालायलाही लागली. त्याचवेळी आठवड्या अखेरीस ते आपली शेती बघायचे. त्यांच्याकडे साडेचारशे एकर शेती होती. वरोराजवळ गोराजा येथे ही शेती होती. त्यांनी मग शेती करता करता शेतकर्‍यांना संघटीत करायला सुरवात केली.

कार्य

बाबांनी सहकाराचा मूलमंत्र शेतकर्‍यांत रूजवायला सुरवात केली. याची परिणती अशी झाली की बाबांनी वरोराचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. एकीकडे असे सार्वजनिक आयुष्य सुरू असताना बाबांचे क्लबमध्ये जाणे, शिकारीला जाणे, टेनिस आणि ब्रिज खेळणे हेही सुरू होते. पैसा प्रचंड मिळत होता. पण एवढे सगळे असूनही बाबा आतमधून तितके सुखी नव्हते. आयुष्याला काही तरी हेतू असावा असे त्यांना वाटत असे.

व्यवसाय

बाबा आमटे हे वकिलीचा व्यवसाय करीत होते. परंतु जेव्हा त्यांना समजले कायद्याची प्रॅक्टिस म्हणजे खोटेपणा असेही एक समीकरण होते. खोटेपणा करून पैसे मिळविणे बाबांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी हरिजनांसाठी काम करायला सुरवात केली. हरीजनांना बर्‍याच लांबून पाणी आणावे लागत असे. बाबांनी उच्चवर्णीयांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यासाठी सार्वजनिक विहीर खुली केली. त्यानंतर 1942 चे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि बाबा त्यात उतरले. त्यांनी वकिलांना संघटीत करून अटक केलेल्या नेत्यांना सोडविण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यासाठी तुरूंगातही गेले.
पुढे वकिलीतील उत्साह संपला आणि त्यांना उदास वाटू लागले. याच काळात त्यांनी केस वाढविले. एखाद्या विरक्त साधूसारखे दिसू लागले.

वैयक्तिक जीवन

एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना, त्यांनी साधना यांना पाहिले आणि त्यांचे मनोमन प्रेम बसले. पण त्यांच्या साधूसारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी त्यांची निर्भत्सना केली. पण साधनाताईंनाही बाबा आवडले. मग त्यांना घरच्या विरोधाला पत्करून लग्न करण्याचे ठरविले.  लग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते. एके दिवशी त्यांनी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला. हातपाय झडलेले, भर पावसात भिजत असलेला तो माणून पाहिला आणि ते भयंकर घाबरले. पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा परतून त्यांनी त्या माणसाची सेवा केली. पण तो जगला नाही. पुढचे सहा महिने उलघालीत गेलेल्या बाबांनी अखेर कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरविले आणि पत्नी साधनानेही त्यांना या निर्णयात साथ दिली. त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले.
तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या रहाण्याची सोय केली. त्यांची सेवा करण्याचे व्रत आरंभले. त्यासाठी ते कुष्ठरोग्यांवरील उपचारही शिकून आले. आनंदवनात कोणतीही सोय नव्हती. त्यांनी या उजाड परिसराचे नंदवन केले. आनंदवन स्वयंपूर्ण व्हावे यासाठी तेथे शेती सुरू केली. आनंदवन हे जगभरातील लोकांसाठी कुष्ठरोग्यांसाठी एक उदाहरण ठरले.

सेवाग्राम

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. 1943 मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना 21 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता.

राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी 1985 मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात एक तप १२ वर्षे नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

अभय साधक

एकदा बाबा रेल्वेने वरोड्याला चालले होते. त्यावेळी रेल्वेत काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबविण्याचा प्रयत्‍न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले, पण नंतर इंग्रजही बाबांना मारू लागले. गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी बाबांना अभय साधक अर्थात न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे नाव दिले.

जोडो यात्रा

पुढे बाबांनी एवढं उभारल्यानंतरही ते शांत बसले नाही. ऐंशीच्या दशकात संपूर्ण भारत अतिरेक्यांच्या कारवाया, फूटीच्या धमक्या अशा बाबींनी ग्रस्त असताना बाबांनी भारत जोडण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर व गुजरातपासून अरूणाचल प्रदेशापर्यंत भारत जोडो नावाची यात्रा काढली. शांतता निर्माण करणे व पर्यावरणाबद्दल जागृती हे या यात्रेचे मुख्य हेतू होते. 1990 मध्ये बाबांनी आनंदवन सोडले आणि ते नर्मदेच्या किनारी येऊन रहायला लागले. नर्मदा आंदोलनाला बळ देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.

संस्था

बाबा आमटेंनी 1949 सालामध्ये महारोगी सेवा समितीची स्थापना केली. तसेच कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापन केल्या.

1) आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
2) सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर)
3) अशोकवन – नागपूर
4) लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा

बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. 1985 साली शंभर दिवसांच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.  मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.

साहित्य

बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत.
‘ज्वाला आणि फुले’ हा कवितासंग्रह आहे.
‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘माती जागवील त्याला मत’

पुरस्कार

बाबा आमटे यांना त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले आहे. पद्मश्री, पद्मविभूषण, गांधी शांतता पारितोषिक, रॅमन मगसेसे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.

Baba Amte information in Marathi language. “बाबा आमटे ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment