Maharashtrachi Sanskriti essay in Marathi language | महाराष्ट्राची संस्कृती मराठी निबंध

Maharashtrachi Sanskriti essay in Marathi language – भारतातील महाराष्ट्र हे राज्य त्याच्या मराठमोळ्या संस्कृतीसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रात मुख्यतः मराठी भाषा बोलली जाते त्याचबरोबर मराठी संस्कृती समृध्द करणारे विविध सणवार, मराठमोळे दाग-दागिने, लग्नाचे विधी, रांगोळ्या केव्हां व कशा काढायच्या, सणावारांशी संलग्न अशा खास मराठी पाककृती, व्रत-वैकल्ये, परवचा व विविध स्तोत्रे इत्यादींसारख्या संस्कृतीशी निगडीत विषयांना वाहिलेले हे ‘संस्कृती’ दालन येथे पहायला मिळतात. विविध विषयांमध्ये लक्षणीय कामगिरी करून मराठी संस्कृतीची कीर्ती वृध्दिंगत करणाऱ्या मराठी व्यक्तींची माहितीही या दालनात जपून ठेवलेली आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आध्यात्मिक लोकजीवनाचा विचार करता या लोकजीवनाला वळण देणारे तीन महत्त्वाचे प्रवाह सांगता येतील. पहिला म्हणजे संतपरंपरा आणि महाराष्ट्र. दुसरा प्रवाह म्हणजे लोकपरंपरा आणि महाराष्ट्र तर तिसरा प्रवाह म्हणजे सुधारकांची परंपरा आणि महाराष्ट्र संतपरंपरेने भक्तिसाक्षर केले, लोकपरंपरेने भावसाक्षर केले तर सुधारकांनी बुद्धिसाक्षर केले. संतांनी विवेकप्रामाण्यवाद दिला. त्यावर सुधारकांचा बुद्धिप्रामाण्यवाद उभा राहिला. तर विवेक आणि बुद्धी या दोन सीमारेषांचे मोठेपण ओळखून कलावंतांनी विशेषतः लोककलावंतांनी कलाविष्कारातून मराठी मनाचे उत्कट भावदर्शन घडविले. संतांनी महाराष्ट्राला नेमके काय दिले, याचे उत्तर काय दिले नाही, असे द्यावे लागेल. मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून संतांनी भागवत धर्मातील भक्तीला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक दिली आणि आपल्या वाङ्मयातून आणि कृतीतून तो मानवतावाद जगाला दिला. महाराष्ट्राचे आणि संतपरंपरेचे एक अद्वय नाते आहे.

आचार्य अत्रे म्हणत, ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकोबाराय हा निःश्वास. ज्या नामाचा गजर करीत लाखो वारकरी आध्यात्मिक स्तरावर अद्वैताची, तर सामाजिक स्तरावर साम्यभावाची अनुभूती घेतात, तो ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा महाराष्ट्राचा महामंत्र आहे. विचारांचे दैन्य फिटो, मनाचे आणि जगण्याचे सार्थक होवो तसेच विवेकाचा आनंद ओसंडून वहावो, ही अनुभूती सर्वांना लाभावी म्हणून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी संतांनी संवाद साधला. लोकपरंपरेचे मोठेपण ओळखून त्यात नवचैतन्य ओतण्यासाठी विवेकाची नवी दृष्टी दिली. त्याचा परिणाम असा झाला की, पंढरपूरच्या वाळवंटात भक्तिप्रेमाची पेठ फुलली. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली.

ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली. अद्वैतभावाची देवाण-घेवाण झाली. सदाचाराचा व्यापार फुलला आणि पंढरीच्या वाळवंटात एकचि टाळी झाली. त्या टाळीचा निनाद संपूर्ण महाराष्ट्रभर घुमला. ही टाळी ज्याला पकडता आली त्याला महाराष्ट्र समजला. भक्तीच्या व्यासपीठावर सारे एक झाले. संतांनी सांगितलेला भक्तिवाद हा केवळ निवृत्तिवाद नाही तर शुद्ध प्रवृत्तिवाद आहे. त्यामुळेच ज्ञानरूप ब्रह्मतत्त्व प्रेमरूप करण्यासाठी तर प्रेमरूप भक्तितत्त्वातून वास्तवाचे दर्शन घडविण्यासाठी संतपरंपरा उभी राहिली. विठ्ठलभक्ती, अध्यात्मदर्शन याबरोबरच पर्यावरण, सामाजिक जाणिवा, सामाजिक मूल्यांचे सद्विचारदर्शन, जगण्यातली स्वाभाविकता, प्रतिकूलतेवर मात करण्याची भूमिका, शुद्ध जीवनप्रणाली आणि लौकिक व्यवहारनीति जागवून लोकजीवनातील भक्तीची गंगा अखंड वाहती ठेवून त्यांनी जीवनवादी विवेकदर्शन उभे केले. या भूमिकेतून संतांनी घडविलेले लोकसंवादी प्रकटीकरण, म्हणजेच ‘भक्तिसाक्षरता’ होय.

महाराष्ट्राला प्राचीन परंपरा आहे. इतिहासाचार्य चिं. वि. वैद्य यांच्या मते ही प्राचीनता सनपूर्व 600 पर्यंत मागे जाते. आज आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो त्या सर्व भूप्रदेशाला एक अभिधान प्राप्त होण्यापूर्वी विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरान्त, बोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा भिन्न भिन्न घटक विभागात महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना होत होती. सातवाहनांच्या शिलालेखात ‘महारठी’ हे नाव आढळते. यावरूनच या प्रदेशाला ‘महारठ’ म्हटले जाऊ लागले आणि त्याचे संस्कृत रूप म्हणून ‘महाराष्ट्र’ हे नाव प्रचलित झाले. वररुची, वात्सायन, भरतमुनी यांच्या ग्रंथात महाराष्ट्र हे नाव आढळते. म्हणजे किमान दोन हजार वर्षे या भूप्रदेशाचे महाराष्ट्र हे नाव प्रचलित आहे. मार्कंडेय, वायू आणि ब्रह्मपुराणातही महाराष्ट्र हे देशनाम सापडते. तेथून पुढे अनेक संस्कृत आणि प्राकृत ग्रंथांतही ‘महाराष्ट्र देशी’ असे संदर्भ आढळतात. स्वतः ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी, पसायदानानंतर ‘ऐसे युगी परी कळी। आणि महाराष्ट्रमंडळी। श्री गोदावरीच्या कुली।’ असा ग्रंथनिर्मितीच्या स्थळाचा उल्लेख केला आहे. इथे महाराष्ट्रमंडळी हा शब्द महाराष्ट्रदेशी अशा अर्थी आहे. सनपूर्व 300 च्या सुमारास महाराष्ट्री भाषेमुळे महाराष्ट्र संस्कृती निर्माण झाली. सनपूर्व 235 च्या सुमारास प्रतिष्ठान नगरीत सातवाहनांची सत्ता स्थापन झाली. सातवाहनानंतर वाकाटक, चातुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या महत्त्वाच्या राजघराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले. हे राजे सुसंस्कृत, प्रजाहितरक्ष आणि कलेचे भोक्ते होते. याच काळात कला, नृत्य, संगीत यांचा उत्कर्ष होऊन महाराष्ट्र संस्कृती भरभराटीस आली. इ. स. 1318 साली यादवांची सत्ता संपुष्टात आली. परकियांची मोठी आक्रमणे झाली. लोकजीवन आणि संस्कृतीवर आघात होऊ लागते. सामाजिक संतुलनाला बाधा आली. राजकीय अस्थैर्याचा तो कालखंड. राजकीय परिस्थिती अस्वस्थ होती. अत्याचार, दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार याने सारा समाज पोखरला. दंभाचार, बुवाबाजी, राजकर्त्यांची सत्ता संपादण्याची असूया, त्यासाठी प्रजेला वेठीस धरणे, गावगुंडांचा गोंधळ यातून लोकजीवनाला उपसर्ग पोहोचत होता.

भौतिक दुरवस्था आणि मानसिक गुलामगिरी यामुळे सामान्य जनता जडमूढ व अगतिक बनली. समाजाची आत्मनिर्भरता हरवली. या केविलवाण्या स्थितीतून तिला मुक्त करण्यासाठी संतचळवळ जन्माला आली आणि देशभाषेची म्हणजे मराठी भाषेची प्रतिष्ठा, भक्तिपंथाचा उदय तसेच कर्तव्यप्रधान समाजजीवन यातून संतप्रबोधनाची दिशा स्पष्ट झाली. लोकसंस्थेचे मोठेपण ओळखून रात्रंदिवस लोकांमध्ये वावरूनच त्यांनी समाजाच्या अंतरंगात आणि बाह्याचारात नवचैतन्य ओतले आणि त्याचे चैतन्यरूप लोककलेच्या अंगाने अधिक समृद्ध झाले. खरेतर संतपरंपरेच्या खूप अगोदरपासून महाराष्ट्रात लोककला आणि लोकपरंपरा उभी होती. लोककला, लोककाव्य, लोकवाणी हे सारे लोकजीवनाशी जेव्हा जोडले जातात, तेव्हाच लोकसंस्कृती उभी राहते. ज्ञानदेवांच्या अगोदरपासून या महाराष्ट्राला काहीतरी सांगणारा, शिकविणारा, आणि जाता जाता प्रबोधन करणारा एक वर्ग या महाराष्ट्रात नांदत होता. वाघ्या, मुरळी, भराडी, गोंधळी, कोल्हाटी, फकीर, मानभाव, दरवेशी, वासुदेव, पिंगळा या साऱ्या लोकभूमिका गावगाड्यात होत्या. पारंपरिक लोककलांमधून त्या लोकांचे मनोरंजन करत होत्या तर दुसरीकडे नीतीचे दोन शब्द सांगून प्रबोधनही घडवित होत्या. मराठी संतांनी विशेषतः एकनाथांनी या प्रतिकात्मक लोकभूमिकांमध्ये रूपकात्मक पद्धतीने अध्यात्मविचारांची मांडणी करीत भारुडे लिहिली. समृद्ध लोककलांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राची लोककला, लोकभूमिका, लोकगीते यांना नृत्य, नाट्य, संगीत, संवाद याची जोड मिळाली आणि ‘मराठमोळा लोकरंग’ उभा राहिला. या लोकरंगात गण आला, गौळण आली, पोवाडा आला, लावणी आली, कटाव आला, भारूड आले. लळित, दशावतार, कीर्तनही सहभागी झाले. लोकधर्माला जागविणारे गोंधळ, जागरण आणि भराडही आले. निखळ मनोरंजनाचा मराठमोळा तमाशाही आला आणि वीरश्री फुलविणारा पोवाडाही. ज्या गावात कीर्तन झाले नाही आणि ज्या गावाने तमाशा पाहिला नाही असे गाव महाराष्ट्रात नसेल. मराठी मन कीर्तनाच्या भक्तिरसात रंगून निघाले तर लावणीच्या पद-शब्दलालित्याने शृंगाररसात न्हाऊन निघाले. मराठी मनाला रिझविणारी लावणी ही यौवनाने, शृंगाराने आणि सौंदर्याने नटलेली. महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीची एक सौंदर्यवती-नटरंगी नार आहे.

इ.स. 1843 च्या सुमारास सांगलीला विष्णुदास भावे यांनी पौराणिक नाटकाचे यथार्थ रूप लोकांसमोर आणले आणि पुढे मराठी संगीत रंगभूमी समृद्ध झाली. मराठी माणूस जेवढा भजन-कीर्तनात रमला तेवढाच संगीत नाटकात. तो जेवढा शास्त्रीय गाण्याच्या मैफिलीत रंगला तेवढाच तमाशा-लावणीतही. ह्या कलाआविष्काराने आणि विशेषत्वाने लोककलेने, मराठी माणसाचे भावविश्व अधिकाधिक खुलू लागले. त्या भावदर्शनात तो स्वतःला विसरला. या लोककलांनी प्रबोधनाचे एक वेगळे तत्त्व उभे केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली। माझ्या जिवाची होतीया काहिली’ ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लावणी, त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. वरवर शृंगाराचा मुखडा घेऊन आलेली ही लावणी, पुढे

मैना गावाकडे एकटी भेट नाही तिची।
तीच गत झाली ह्या खंडित महाराष्ट्राची।

महाराष्ट्रातील सुधारकांचा विचार करताना, ‘महाराष्ट्र ही महान व्यक्तींची जन्मभूमी आहे, महान कृतींची कर्मभूमी आहे, अभंग उक्तीची स्फूर्तिभूमी आहे आणि अलौकिक त्यागाची व सेवेची यज्ञभूमी आहे,’ हे आचार्य अत्र्यांचे विधान किती यथार्थ आहे, हे लक्षात येते. महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेली सुधारकांची मालिका सामाजिक स्तरावर तर्कनिष्ठ बुद्धिवादी विचारांचा प्रवाह पुढे नेत होती. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, महर्षी कर्वे, गाडगेबाबा अशा सुधारकांनी त्यागाची आणि सेवेची यज्ञभूमी उभारून वेळोवेळी बंडाचे निशाण फडकावले. बुद्धिप्रामाण्यवादातून महाराष्ट्राच्या ह्या बंडखोरांची परंपरा वैचारिक क्षेत्रापर्यंत आणून ठेवली. धर्मवादाला परंपरेच्या जोखडातून मुक्त करून विज्ञाननिष्ठ सुधारणावादाची जोड देत महाराष्ट्राला पुरोगामी दृष्टी दिली. हीच बुद्धिसाक्षरत्वाची खरी साक्ष आहे. या परंपरा आणि प्रवाह पाहता संत, लोककलावंत आणि सुधारक यांचा विसर पडणे, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक साक्षरतेचा पराभव आहे, असेच म्हणावे लागेल.

प्रत्येक संस्कृतीची विशिष्ट रचना असते. त्या विशिष्ट रचनेत सर्व सामाजिक संस्था अंगप्रत्यंगाप्रमाणे एकमेकांत ओवलेल्या असतात. धर्म, नीती, शिष्टाचार, कर्मकांड, कायदा, विवाहसंस्था, आर्थिक उत्पादनपद्धती इ. सामाजिक संस्था व सामाजिक प्रवृत्ती एकमेकांत गुंतलेल्या असतात त्या एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्यात सहकार्य व विरोध सुरू असतो. त्यांच्यापैकी एकात बदल झाला की, त्याचा परिणाम इतरांवर होतो. संस्कृती ही अंगप्रत्यंगांनी युक्त अशी रचना किंवा आकार आहे. प्राथमिक स्थितीतल्या किंवा उन्नत स्थितीतल्या प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक जीवन भिन्न असते.
19 व्या शतकात ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणवणाऱ्या चिपळूणकरांनी तिच्या वृध्दीची हाक दिली. माधव जूलियन यांनी 1922 मध्ये या मायबोलीची सुंदर आरती आळवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुध्दीची जोरदार मोहीम उघडली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रामीण, दलित, आदिवासी अशा साहित्यप्रवाहांनी मराठीला नवे चैतन्य प्राप्त करून दिले. जागतिक मराठी परिषदेने ‘हे विश्वचि माझे घर’ या उक्तीचा अनोखा आविष्कार घडवला. आता संगणकाशी सलगी करत मराठी भाषा विस्तारत आहे. माझ्या मला अभिमान आहे.

Maharashtra chi Sanskriti essay in Marathi language. महाराष्ट्राची संस्कृती हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.

Share on:

Hey there! This is Supada Bochare, a student of engineering and a blogger. Blogging is my Passion. I love to write articles on different topics. I also like to do things related to WordPress, Digital Marketing and Latest technologies.

Leave a Comment

x