Marathi Bhashache mahatva essay in Marathi language | मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध

Marathi Bhashache mahatva essay in Marathi language – भाषा कोणतीही असो, भाषा हे माणसाला मिळालेले वरदान आणि शापही आहे असे म्हणण्यास हरकत नाही. वरदान अशा अर्थानं की, अन्य कुणाही प्राण्याला न लाभलेल्या साधनातून मनुष्यप्राणी आपल्या भावभावना, विचार स्पष्टपणे व्यक्त करू शकतो. संवाद, वाद-विवाद करू शकतो आणि शाप या अर्थाने की, भाषेमुळेच अनेक समज-गैरसमज, समस्या, संघर्ष निर्माण होतात. असं असलं तरी भाषा टाळून माणसाचा विचार करता येत नाही. विश्वाच्या जडणघडीत माणूस अस्तित्वात येणं आणि माणसाच्या अस्तित्वात भाषेनं प्रवेश करणं हा एक चमत्कारच आहे.

जगभरात हजारो भाषा आणि बोलीभाषा बोलल्या, लिहिल्या जातात आणि त्यांचे स्वरूप विशद करणारे प्रगत भाषाशास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत. त्याच्या तपशिलात न जाता आपण एवढे म्हणूया की, भाषा एक माध्यम आहे. आणि तो-तो भाषिक समूह त्या-त्या माध्यमांना विशिष्ट अर्थ देत असतो आणि संकेताने तो प्रचलित होतो. तर आपण मराठी भाषेचे महत्त्व पाहणार आहोत.

महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. मराठी ही राजमान्य लोकमान्य राज्यभाषा झाल्याला आता चाळीस वर्ष होऊन गेले, तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही. हे मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज असे म्हणतात, “महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राज्य मान्यतेचा सोनेरी मुकुट घालून उभी आहे, परंतु तिच्या अंगावरचे वस्त्र फाटके आहेत.” मराठीच्या स्वतःचे राज्य असावे, मराठीला राजभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्षे हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली, संघर्ष केले. प्रसंगी बलिदान ही केले.

हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू |
हिला बसून वैभवाच्या शिरी ||

अशी या महाराष्ट्रातील शूरवीरांची आकांक्षा होती. त्यांच्या अविरत प्रयत्नाने 1960 साली 1 मे च्या मुहूर्तावर मराठी ही राजभाषा झाली. पण आजही महाराष्ट्राच्या राजधानीत ती परकी व पोरकी आहे.

दीडशे वर्ष ज्यांनी तुम्हाला गुलाम केले बनवले ह्या राज्यकर्त्यांच्या इंग्रजी भाषणे आज या स्वतंत्र राज्यातील जनतेच्या मनावर मायाबी जादू केली आहे. इंग्रजांच्या राज्यात कारभाराची भाषा झालेली इंग्रजी नोकरी मिळवण्याच्या सुलभ सोपान ठरली. आजही लोक आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात, परदेशगमनाचा योग लवकर यावा, अशा उद्देशांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणारी ही आजची मुले उद्याचे नागरिक होतील, तेव्हा त्यांनी मराठी भाषेविषयी आपुलकी वाटणार नाही. ही मुले मराठीतील अभिजात वाड्मयाचा आस्वाद घेऊ शकतील नाही.

इंग्रजी माध्यमांच्या शाळा शिकणारी ही मुले आपला रिकामा वेळ सोशल मीडिया ऑनलाईन गेम्स यामध्ये वाया घालतील. मग त्यांना शिवाजी, तानाजी यांच्या पराक्रमाच्या कथा कशा कळणार? अमरेंद्र गाडगीळ यांच्या ‘आईची देणगी’ चा आशीर्वाद देऊ शकणार नाही. साने गुरुजींच्या ‘गोड गोड गोष्टी’ आणि सुंदर पत्रे यांच्यापासून ते अन्न राहतील. पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणातील विनोद त्यांना समजणार नाही. केशवसुत इंग्रज यांच्या कविता त्यांच्या ओठावर रेंगाळणार नाहीत. फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेली मराठी साहित्याचा दरबार हळूहळू रिकामा होऊ लागेल.

आयुष्यात अनेक गोष्टी आपण गांभीर्याने घेतो, भाषेला मात्र गृहित धरतो, ‘त्यात काय विशेष’ असं म्हणतो, ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशी भाषेची स्थिती असते. खरंतर भाषा जीवनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. भाषा ही संदेशवहनाचे साधन आणि माध्यम असते, हे खरेच आहे. पण भाषेचे मानवी जीवनातील स्थान एवढेच असत नाही, त्यापेक्षा ते मोठे आणि सर्वव्यापी असते. भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचेच अभिन्न आणि अविभाज्य अंग असते. भाषेने माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेले असते. वापरा किंवा न वापरा, भाषा कायम आपल्यासोबत असते. भाषेतून माणसाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, मूल्यदृष्टी व्यक्त होते.

भाषेतून माणसाचा भौगोलिक परिसर कळतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाषेतून माणसाची संस्कृती व्यक्त होते. भाषेतून ज्ञानव्यवहार होतो आणि सौंदर्यनिर्मिती होते. भाषा औपचारिक असते तशी अनौपचारिक असते, अधिकृत असते तशी अनधिकृत असते, खरी असते तशी खोटी असते, सांगायची असते तशी न सांगायची असते, खासगी तशी सार्वजनिक असते. अगदी मौनाचीही असते. भाषा प्रेमाची असते, भांडणाची असते, तोडण्याची असते आणि जोडण्याचीही असते. अशी खूप खूप काही असते. मुद्द्याची गोष्ट म्हणजे माणसाचा त्याच्या भाषेशी जैविक संबंध असतो.

भाषा माणसाच्या आयुष्यात सार्वभौम असते. हे झाले माणसाविषयी पण एकूणच मानवी संस्कृतीच्या आणि बौद्धिक विकासाच्या प्रक्रियेत भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. हेही ध्यानात घ्यायला हवे. कुठली एक भाषा दुसऱ्या भाषेपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही. असे समजणे अशास्त्रीय आहे, अडाणीपणाचे आहे, पण मुख्य म्हणजे असे मानणे म्हणजे आपली अधिसत्ता अबाधित ठेवू पाहणाऱ्या उच्चवर्गाचे, वर्णाचे आणि बहुजनांना त्यांच्या आत्मसन्मानापासून वंचित ठेवण्याचे राजकारण आहे.

स्टिव्हन पिंकर हे हॉर्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आहेत. ‘द लँग्वेज इन्स्टिक्ट’ या त्यांच्या पुस्तकाच्या 25 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. लाखो प्रती खपल्या आहेत, हे पुस्तक बेस्ट सेलर आहे. त्यांनी भाषाभेदावर त्यातल्या उच्चनीचतेवर आणि त्यामागच्या राजकारणावर कठोर प्रहार केला आणि माणूस जसा त्याच्या दोन पायांवर उभा राहू शकतो, तितक्याच नैसर्गिकपणे आणि सहजपणे सर्वच भाषांची क्षमता सारखी असते हे दाखवून दिले आहे. ते साक्षर म्हणवणाऱ्या अडाण्यांनी जरूर वाचायला हवे असो, ‘इन द बिगनिंग वॉज द वर्ड अँड द वर्ड वॉज गॉड’ असं बायबलमध्ये म्हटलंय. शब्दाचं आणि म्हणून भाषेचं माहात्म्य असं अगाध आहे.

मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. ही मुख्यतः महाराष्ट्र व गोवाच्या काही भागात बोलली जाते. जगभरात बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही 10 व्या क्रमांकाची भाषा आहे व भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषापैकी मराठी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.  मराठी ही जगातील प्राचीन भाषापैकी एक आहे. मराठी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13 व्या शतकात आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा गायला होता. महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे व आजवर अनेक महान लेखकांनी आपल्या लिखानाने मराठी भाषेच्या साहित्यात भर केली आहे.  एक न अनेक साहित्य कृतीमुळे मराठी भाषा जगभरात पोहचली आहे.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण संख्या 9 कोटी आहे.  मराठी भाषेत अनेक महान लेखकांनी साहित्य लिहिले आहे. परंतु मराठी भाषेचे उत्कृष्ट कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याच्या स्मृतींना स्मरण म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रवारीला साजरा केला जातो. कुसुमाग्रजां शिवाय अनेक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांनी मराठी भाषेच्या विकासासाठी कार्य केले.

आज मराठी भाषा ज्या रूपात जिवंत आहे, त्या रूपात तिला जिवंत ठेवण्यामागे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. शिवरायांमुळे महाराष्ट्र व मराठी भाषा टिकून आहे. मध्ययुगात अनेक विदेशी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, शिवरायांनी मोठ्या शौर्याने यांच्याशी लढत महाराष्ट्र व मराठी भाषेचे रक्षण केले.  मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरासाठी हळुवार आणि प्रेमळ असतात व वेळप्रसंगी जी आई मुलाच्या चांगल्यासाठी कठोर शब्दही बोलते तशीच आपली मराठी आहे. तिच्या शब्दाची शक्ती प्रचंड आहे. जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत आपण आपली मराठी भाषा विसरू नये अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले होते.

आपणही मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण करूया तर तुम्हाला हा निबंध कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. Marathi Bhasheche mahatva essay in Marathi language.

Leave a Comment