संत बसवेश्वर | Sant Basaveshwar

Sant Basaveshwar आपल्या भारताचा इतिहास गौरवशाही राहिलेला आहे. अश्या इतिहासात अनेक समाजसुधारक, युगपुरुष होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य हे सहज नव्हते, आज ही त्यांच्या सारखं कार्य करू शकत नाहीत. असेच एक महापुरुष 900 वर्षांपूर्वी होऊन गेले. ते म्हणजे विश्वगुरु जगतज्योति महात्मा बसवेश्वर.

संत बसवेश्वर Sant Basaveshwar

सुंदर आचरण असणाऱ्या व्यक्तींची सुंदर रचना म्हणजे वचने आहेत. वचने हे एक अनुभवजन्य साहित्य आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पुरोहित शाही, काल्पनिक धर्मग्रंथ, जातिभेद स्त्रीदास्य, श्रम इत्यादी अनेक विषयांवर प्रहार करणारे क्रांतिकारक विचार वाचनात आहेत. ‘वचन’ हा लिंगायतांच्या धर्मग्रंथ आहे. चला तर मग बसवेश्वर महाराजांविषयी माहिती पाहूया.

जन्म

मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात मंडगीमदिराज आणि मादलांबिका या वीर शैव कुळातील दांपत्याच्या पोटी 1131 वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया दिवशी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला.
काहींच्या मते त्यांचा जन्म इंगळेश्वर या गावी झाला असावा. त्यांच्या जन्म काळाविषयी मतभेद असले तरी सामान्यता त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय तृतीया ला 1131 झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील अदिराज आणि आईचे नाव मदलाअंबिका आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते.

बालपण

श्री बसवेश्वर वयाच्या अठराव्या वर्षी ज्ञान मिळविण्यासाठी कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडल संगम येथे गेले. ते वीरशैव व प्राचीन अध्ययन केंद्र होते. तेथे महात्मा बसवेश्वरांनी काही वर्षे वास्तव्य केले. कुडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले व तेथे 31 वर्षे राहिले.

जीवन

बसवेश्र्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात  हिंदू, जैन, बैद्ध धर्म व कापालिक, कालामुख,  शाक्त पंथ प्रचलित होते. परंतु ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेतच होती. या पार्श्र्वभूमीवर बसवेश्र्वरांनी शिव हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्र्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.  ‘ॐ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.

चमत्कार

बसवेश्वर हे एक समर्थ योगी असल्यामुळे त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाल्याचे व त्यांनी काही चमत्कार केल्याचेही उल्लेख आढळतात. पूर आलेला त्यांना कृष्णेने वाट करून दिली, त्यांनी बिज्जलाला गुप्त खजिना दाखविला, धान्यकणांचे रत्नांमध्ये रूपांतर केले. कथा सांगितल्या जातात. त्यांच्याकडे चोरी करण्यासाठी व दरोडे घालण्यासाठी आलेले लोकही त्यांचे शिष्य बनले, यावरून त्यांचा प्रभाव ध्यानात येतो.

बसवेश्वर यांचे सामाजिक कार्य

बसवेश्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्म इतिहासातील अनन्यसाधारण संस्था आहे. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही,

भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही.  परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये, वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. बाराव्या शतकात या मंटपातील शून्यपीठाचे अध्यक्षपद अल्लमप्रभू यांना देण्यात आले होते. येथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून बसवेश्वरांनी वेगवेगळ्या जातिजमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.

पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजाति मूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव बसवेश्वरांना झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. यामुळे त्यांच्याभोवती सर्व जाती धर्मातील वर्णातील लोक व अनुयायी एकत्रित आले.

आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण व हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी  शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी सुरू केलेले हे कार्य क्रांतिकारक होते.

समाजीक परिवर्तन

बसवेश्वरांनी बालविवाहाला विरोध केला. तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री व पुरूष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत. बसवेश्वरांनी स्वतःचा उपनयन-संस्कार करून घ्यावयाचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते.

आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले आणि तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यतच्या अनुयायांचे एक मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते, यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते.

शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग आहे, अशी घोषणा  करणारा ‘कायकवे  कैलास’ हा  बसवेश्र्वरांनी  मांडलेला  एक  महान  सिद्धांत  आहे.  कोणत्याही  प्रकारचे  शारीरिक  श्रम  हे हीन दर्जाचे नाहीत, असे  सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या श्रमावरच आपली उपजीविका चालवावी.

या बाबतीत जंगमांचाही अपवाद करू नये, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितल्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात भिक्षावृत्तीला वाव राहिला नाही. परंतु त्यांनी कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मोक्षासाठी अरण्यात पलायन करण्याची गरज नाही, असे हा सिद्धांत मानतो. श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी मांडल्यामुळे बसवेश्वरांची वृत्ती  समाजवादी  होती, असे काही अभ्यासक मानतात.

बसवेश्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः  ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन  मिळाले आणि सर्व व्यावसायिकां -मध्ये समभाव निर्माण झाला. त्यांच्या अनुभव मंटपात वेगवेगळ्या जातींचे संत जमत असत. ब्राह्मण मधुवय्या, चांभार हरवळ्या, ढोर कक्कय्य, नावाडी चौंड्या, सुतार बसप्पा, मांग चन्नया, न्हावी आप्पाण्णा, रणशिंगधारी ढक्कद वोमण्णा, सोनार किन्नरी ब्रह्मय्या, गुराखी रामण्णा, दोरखंड करणारा चंद्या, पारधी संगय्या इत्यादींचा त्या संतांमध्ये अंतर्भाव होतो.

साहित्य

आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचावेत म्हणून त्यांनी संस्कृतऐवजी कन्नड भाषेतून आपला उपदेश केला. त्यासाठी त्यांनी आधीच प्रचलित असलेल्या वचननामक साहित्यप्रकाराचा अवलंब केला. शैलीदार, प्रभावी व अंतःकरणाला भिडणारा असा हा साहित्यप्रकार असल्यामुळे त्याला वचनभेद, वचनशास्त्र इ. नावे प्राप्त झाली आहेत. कन्नड साहित्याच्या क्षेत्रात बसवेश्र्वरांचे योगदान म्हणूनच अंत्यत महत्त्वाचे ठरले. बसवेश्वरांच्या पट्स्थलवचन, कालज्ञान, मंत्रगौप्य, शिखारत्नवचन या ग्रंथांना श्रेष्ठ धर्मग्रंथांचे अमरत्व कन्नडमध्ये प्राप्त झालेले आहे.

अठराव्या शतकात कांचीचे शंकराराध्य यांनी संस्कृतमध्ये बसवपुराण नवाचा ग्रंथ लिहिला आहे. महाभारतकार व्यासांच्या नावावर असलेला परंतु चौदाव्या शतकानंतर दुसऱ्याच कोणी तरी लिहिलेला बसवपुराण नावाचा आणखी एक संस्कृत ग्रंथ आढळतो. हा ग्रंथ करिबसवशास्त्री यांनी लिहिला असे म्हणतात. तमिळमध्ये बसवपुराण, प्रमुलिंग लीले मराठी अनु. कविब्रह्मदासकृत, लीलाविश्र्वंयभर आणि बसवपुराणपट्कम अशा तीन ग्रंथांतून बसवेश्वरांचे चरित्र आढळते.

हरिहर नावाच्या कवीने 1180-1220 मध्ये कन्नड भाषेत बसवराजदेवररगळे या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे. तसेच पाल्कुरिकी सोमनाथ  यांनी तेलुगूमध्ये बसवपुराण लिहिले असून भीमकवी यांनी त्याचे कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी इ. भाषातूनही बसवेश्वरांची चरित्रे लिहिण्यात आली आहेत. बसवेश्र्वर जयंतीच्या दिवशी बसव वागेवाडी व कूडलसंगम, बसवकल्याण, उळवी ठिकाणी यात्रा भरतात. बसवेश्वरांच्या नावांनी चालणारी ग्रंथालये, शिक्षणसंस्था, बँका, प्रकाशने इत्यादींच्या रूपाने त्यांची अनेक स्मारके करण्यात आली आहेत.

Sant Basaveshwar संत बसवेश्वर ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment