संत सेना Sant Sena Nhavi information in Marathi language

Sant Sena Nhavi information in Marathi language – प्रत्येक समाजाने आपले संत वाटून घेतले. प्रत्येक समाजाने आपला संत समाजापुरता मर्यादित ठेवलेला आहे. परंतु संतांसाठी जात-पात यांच्या मर्यादा नसतात. संत हे सर्वांना समानतेची वागणूक देत असतात. सेना महाराज हे एक मराठी  वारकरी संत असून त्यांना नामदेवांच्या काळातील मानले जातात.

जन्म

संत सेना महाराज यांचा जन्म वैशाख वद्य व्दादशी रविवार 1190 या दिवशी अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात विलासपूरकडे एक फाटा जातो. त्या फाट्यावर उमरिया नावाचे एक स्टेशन आहे. तेथून एक गड दिसतो. तो गड म्हणजेच बांधवगड या ठिकाणी झाला. महाराष्ट्राशी भावनिक संबंध ठेवून परप्रांतात जाऊन राहिलेले अनेक कुटुंब होते. संत सेना महाराजांचे वडीलही त्यापैकी एक होते. बांधवगड एक वैभवशाली नगर होते. रामराजा नावाच्या राज्यात सेना महाराजांचे वडील श्री देविदासपंत हे दरबारात राजकीय सल्लागार व विज्ञानवादी वैद्य होते.

बालपण

सेना महाराजांचा जन्म हा इश्वरी कृपेने झाला होता. सेना महाराजांच्या घरात सुरुवातीपासुनच विज्ञानवादी वातावरण असल्यामुळे बालपणापासुनच त्यांच्यावर समतावादी, वैज्ञानिक चिकित्सक संस्कार झाले होते. त्यांच्या घरी वडील देवीदासपंत, आई प्रेमकुंवरबाई व सेनाजी अशी मंडळी होती. सेनाजी हळूहळू वाढू लागले. वडीलांच्या सहवासात बुद्धी चौकस, चंचल, बौद्धिक चातुर्याचे संस्कार सेनाजीच्या मनावर होत होते. भजन, किर्तनातुन त्यांचे ज्ञान अधिकच वाढत होते.

व्यवसाय

मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले असायचे अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते.

संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात. हेच यावरुन सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घडले. महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकडे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले. जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती. त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगडाला पुनवैभव प्राप्त झाले. राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले.

काळ

संत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत. जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेना महाराजांचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. शिखांचा धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात संत सेनांच्या एका पदाचा समावेश केला आहे. पूर्वीपासून वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमवेत त्यांचे नाव घेतले जाते. त्यांची मराठी धाटणीची, वळणाची, संस्कारांची मराठी कविता आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच उत्तर भारतातील प्रांतात विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजराथ, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे.

जीवन

संत सेनामहाराज हे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उतर भारतामध्ये गेले होते.
कालांतराने मोठे होऊन सेनाजींचा विवाह सुंदराबाई यांच्याशी झाला. वडिलांचा संपूर्ण भार सेनाजीवर आला होता. थोडयाच दिवसात आई प्रेमकुंवरबाईनी देह ठेवला. तिकडे रामराजाच्या जागेवर त्यांचा मुलगा विरसिंग गादीवर बसला होता. आता सेनाजी आपल्या वडीलांचा व्यवहार बघत होते. राजाला मार्गदर्शन करणे, वैदिक सेवा करणे इत्यादी कामे सेनाजी करीत होते. वडीलांबरोबर वावरत असताना त्यांनाही राजकीय अभ्यास होता. सेनाजीवर महापंडीत उपाली यांच्या विनयपिटक ग्रंथाचा प्रभाव होता.

साहित्य

सेना महाराजांनी हजारो अभंगाची निर्मिती करून सैनपंथ नावाची चळवळ भारतात सुरु केली. हीच चळवळ आज महाराष्ट्रात वारकरी म्हणून प्रसिद्ध आहे. पंढरपूरात त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. याच काळात संत चळवळीत महाराष्ट्रात त्यांचे नाव कोरले गेले. त्यांनी नंतर अनेक मराठी अभंग रचले. परंतु आपल्या समतेची शिकवण संपूर्ण भारतात पसरावी या हेतूने नंतर ते संपूर्ण भारतात फिरले. पंजाबमध्ये असतांना त्यांनी अनेक पंजाबी भाषेत दोहे रचले. हेच दोहे मोठ्या आदराने शिखांचे तिसरे गुरू गुरू अर्जुन सिंह यांनी गुरु ग्रंथ साहेबा यांच्यात समाविष्ट केले.  सध्या सेना महाराजांचे साधारण इतके मराठी अभंग उपलब्ध आहेत. संत नामदेवांप्रमाणेच सेना महाराजांच्या काही रचना शीखांच्या पवित्र अशा गुरुग्रंथसाहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. सेना महाराजांच्या अभंगामध्ये नामपर, पंढरी वर्णनपर, उपदेशपर, आत्मपर, पाखंड खंडन पर व संत महिमा सांगणारे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव यांचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत.

स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी. संत नामदेवांप्रमाणेच संत सेना यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांमध्ये साहित्य लिहिले आहे. हे प्रसिद्ध संत सेना महाराज व्यवसायाने न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग :

आम्ही वारीक वारीक | करू हजामत बारीक ||विवेक दर्पण आयना दाऊ | वैराग्य चिमटा हालऊ ||
उदक शांती डोई घोळू | अहंकाराची शेंडी पिळू||
भावार्थाच्या बगला झाडू | काम क्रोध नखे काढू ||
चौवर्णा देऊनी हात | सेना राहिला निवांत ||

रोज दोन प्रहर चरितार्थासाठी काम करणे व उरलेला वेळ हरी चिंतनामधे व्यतित करणे अशी त्यांची दिनचर्या होती. याचा उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या एका अभंगामध्ये केला आहे.

संत सेना विषयी अशी एक कथा आहे

एके दिवशी सेना महाराजांकडे काही साधुसंत आले होते व त्यांच्याबरोबर चर्चा करत बसले होते. त्याचवेळेस त्यांना राजवाड्यातून कामासाठी बोलावणे आले. तेव्हा सेना महाराजांच्या पत्नीने ते थोड्याच वेळात येत आहेत असा निरोप पाठवला. निरोप देणा-यांनी मात्र सेना महाराज त्यांचे पाहुणे गेल्याशिवाय येणार नाही असा चुकीचा निरोप दिला. यामुळे राजाला राग आला व त्याने त्‍यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा दिली. अर्थात याच वेळेस भगवंत सेना महाराजांचे रूप घेऊन राजदरबारात राजाकडे आले व देवाने राजाची दाढी केली. त्यावेळेस आरशामध्ये मधेच राजाला सेना महाराजांच्या जागी भगवंताचे रूप दिसले. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाला काही सूचेना. राजाने मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला व सेना महाराजांच्या रूपातील देव परत गेले. इकडे थोड्यावेळाने सेना महाराज आपली धोकटी घेऊन राजाची सेवा करण्यासाठी आले. आल्यावर त्यांना झालेला प्रकार समजला. या चमत्काराचे वर्णन करणारे सेना महाराजांचे, संत जनाबाईंचे अभंग उपलब्ध आहेत.

समाधी

गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप डोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अडकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुळातील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले. ‘जाता पंढरीसी सूख वाटे जीवा’ असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते. बांधवगड येथे सेना महाराजांचे स्मृती म्हणून काही बांधकाम अजूनही आहे. याशिवाय श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर बेलीचा महादेव मंदिरासमोर संत सेना न्हावी महाराज समाधी मंदिर आहे. याठिकाणी सेना महाराजांचा समाधी उत्सव श्रावण पक्षामध्ये पंधरा दिवस साजरा होतो.

Sant Sena information in Marathi language sanसंत सेना महाराज याविषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment