Vinodache Mahatva essay in Marathi language | विनोदाचे महत्त्व

Vinodache Mahatva essay in Marathi language – प्रत्येकाला वाटत असते की, आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व आनंदी राहावे परंतु हे शक्य नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याच्या वाट्याला सुख आणि दुःख येतात. सुखामध्ये सर्वजण आपल्या सोबत असतात मित्र-मैत्रिणी, पती-पत्नी, कुटुंबातील तसेच समाजातील इतर लोकही सुखामध्ये सोबतीला असतात परंतु जेव्हा दुःखाचा डोंगर आपल्यावर ओढतो तेव्हा मात्र आपल्याजवळ उरतो ते केवळ विनोद. अतिशय दुःखद अवस्थेमध्ये असतानांही आपल्या आजूबाजूला जर आपण विनोद वाचला किंवा ऐकला असेल तर आपले चटकन लक्ष त्याकडे खेचली जाते व चेहऱ्यावरील दुःख विसरून आपण खदखदून हसतो व आपला चेहरा काही वेळ का होईना परंतु हास्य आपल्या ओठांवर येते. वास्तव सुसह्य फक्त ‘विनोद’च करू शकतो. कारण हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते. ताणतणाव कमी करण्याचे कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद! विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात. काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात. तर चला मग विनोदाचे महत्व पाहूया.

नक्की वाचा –

विनोद हा जसा साहित्यातून प्रगट होतो, तसाच तो चित्रातून दृश्यरूपाने प्रकटतो. नाटकामधून अभिनीत होतो. सर्कशीतून, तमाशातून कृतिरूपाने प्रकट होतो. विनोद हा केवळ कला प्रकारातूनच प्रकट होतो असे नव्हे; तर प्रत्यक्ष जीवनातही घडत असतो व तो साधारणतः सर्वांना आवडतो. विनोदाला प्रत्यक्ष जीवनामध्ये स्थान असल्यामुळे विनोदाचा विचार केवळ साहित्याचा वा कलाविष्काराचा भाग म्हणून न होता, जीवनानुभवाच्याही अंगाने होणे स्वाभाविक आहे. अनेक कलाप्रकारांशी निगडित असलेल्या आणि प्रत्यक्ष जीवनातही सातत्याने प्रकटणाऱ्या विनोदाचा विचार बराच गुंतागुंतीचा ठरतो. विनोदाची निर्मिती कशी होते? हे सांगणाऱ्या उपपत्ती जशा जीवनाच्या अनुषंगाने मांडल्या जातात, तशाच त्या कलेच्या अनुरोधानेही मांडल्या जातात.

शब्द या माध्यमाचा उपयोग करून वाङ्मयातून प्रकट होणारा विनोद स्वाभाविकपणे विविध रूपे धारण करून प्रकट होतो म्हणून वाङ्मयीन विनोदाच्या विचाराला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. विनोद या संकल्पनेचे स्वरूप ध्यानात येण्यासाठी विनोदाची निर्मिती का व कशी होते, हे सांगणाऱ्याउपपत्तींचा परामर्श घेणे उपयुक्त ठरते. विनोदाची संकल्पना ही गुंतागुंतीची असल्यामुळे तिचे स्वरूप विशद करण्याच्या दृष्टीने प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेकविध नवनवीन उपपत्ती तत्त्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, प्रतिभावंत लेखक, समीक्षक आदींनी मांडलेल्या आहेत. ह्या उपपत्ती विनोदाच्या स्वरूपावर काही एक प्रकाश टाकत असल्याने, त्यांचा परामर्श घेऊन विनोदाचे स्वरूप उलघडता येईल.

जगामध्ये आपण इकडे तिकडे हास्याचा प्रचंड साठा शोधत असतो. परंतु हा साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो; परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल. ‘हास्य’ ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. माणसाला आपल्या दुःखाचा निचरा करण्यासाठी हास्य हा रामबाण उपाय सापडला आहे, म्हणूनच माणूस म्हणजे हसणारा प्राणी ही माणसाची व्याख्या योग्य ठरते. हे हास्यविनोद यामुळे निर्माण होते म्हणून तर मानवी जीवनात विनोदाला महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सर्कशीत जे प्रयोजन विदूषकाचे तेच मानवी जीवनात विनोदाचे ! मानवी जीवन म्हणजे सुद्धा एक तारेवरची कसरत असते. ‘सुख पाहता जीवा पडे। दुःख पर्वताएवढे।। संत तुकारामांनी मानवी जीवनात वर्णन केले आहे. या पर्वताएवढे दुःखा खाली चिरडून जाताना विनोदाचा आधार आवश्यक ठरतो. विनोदाने क्षणभर का होईना, पण दुःखाचा विसर पडतो. पण हा क्षणच माणसाचा हुरूप वाढून त्याचे आयुष्य सुसह्य करतो. हसायला कुणाला आवडत नाही? पण इथे वेळ कोणाकडे आहे? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ. सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे. इथे हसायचे म्हंटले तरी लोकांच्या जीवावर येते काहीना तर हसायचे म्हंटले तर रडायलाच येते!
मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून देवाने कल्पनाशक्ती दिली आणि जे आहे ते सुखमय व्हावे यासाठी विनोदबुद्धी दिली. अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल. काल्पनिक विनोद असतात ते अधिकतर प्रचारात असतात आणि ते प्रवाही होऊन जातात. मात्र त्यांच्या उपत्तीकाराची काही नोंद राहत नाही.

काही विनोद सूचक पण चावट असतात. ते सांगनाऱ्याच्या तोंडापेक्षा ऐकणाऱ्याच्या कानात अधिक फुलतात. ज्यांना विनोदबुद्धी नाही त्यांच्यात ती उत्पन्न करणे आणि ज्यांच्याकडे थोड्याप्रमाणात  आहे त्याची वाढ करणे असे काम काही विनोदवीर करत असतात. ‘विनोद’ हे अमर असे साहित्य आहे, त्यामुळे ते सर्वांच्या मालकीचे आहे. स्थळ, काळ व वेळ न पाहता केलेला कोणताही विनोद कितीही चांगला असला तरी दाद मिळवू शकत नाही कारण त्याला ‘वाईड जोक’ म्हणतात.

काही विनोद सोज्वळ असतात तर काही विनोद एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर केलेले असतात. त्यावर लोक हसले तरी त्याला चांगले विनोद म्हणता येणार नाही. काही लोकानातर विनोद केलेलेच समजत नाहीत हाही एक मोठा विनोदच आहे म्हणा. विचित्रपणा किंवा विसंगतीमुळे  खूप विनोद होतात आणि अशा विसंगती माणसांच्या जीवनात ठासून भरलेल्या असतात. आजचे जीवन खूपच ताणतणावाचे झाले आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे विनोद. त्याने जीवन  सहज आणि सुंदर बनते.

आयुष्यातील दुखाचे हसून विस्मरण करणे हा खरा विनोदाचा उद्देश आहे. ज्या विनोदात हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद म्हणजे ‘सर्वश्रेष्ठ विनोद’. हास्यविनोद म्हणजे मोठा मानवधर्म आहे. त्यामुळेच तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन’ आपल्या जीवनातील हास्याचा जास्तीत जास्त आनंद मिळावा. नियती कुणालाही चुकली नाही आणि चुकनारही नाही. जिथे जिथे तणाव आहे, तिथे विनोदाची गरज आहे. विनोदामुळे रक्ताला उसळी मिळते. नसानसातून वीज सळसळते मेंदू तल्लख बनते आणि शरीर व्यवस्था ठीकठाक बनते. देवाने माणसाला ज्या देणग्या दिल्या आहेत त्यातील हास्य एक मौल्यवान देणगी आहे. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!’ आणि हे फक्त विनोदामुळेच  शक्य आहे.

सुखात्म जाणीव निर्माण करणारा आशय असणे एवढेच वैशिष्ट्य विनोदाच्या निर्मितीला पुरत नाही असेही दिसते. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता सुखात्म जाणीव निर्माण करणारी निश्चितपणे आहे; मात्र तिला विनोदी कविता म्हणता येणार नाही. म्हणजेच आशयाच्या जोडीने दुसरे एक वैशिष्ट्य विनोदनिर्मितीसाठी आवश्यक असते. ते म्हणजे अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होय. त्या दृष्टीने गोविंदाग्रजांची ‘गुलाबी कोडे’ ही कविता विनोदी म्हणता येईल. या कवितेचा आशय पतिपत्नीमधी हृद्य शृंगाराचे चित्रण करून त्याद्वारा सुखात्म जाणीव निर्माण करणारा आहे. शिवाय ही सुखात्म जाणीव विनोदाच्या विशिष्ट अभिव्यक्तिवैशिष्ट्यासह प्रत्ययाला येते.

विनोदाची निर्मिती होण्यास तंत्राला महत्त्वाचे स्थान असते, हे जाणवल्याने काही उपपत्तिकारांनी विनोदनिर्मिती ही तंत्रात्मक साधनांचा अवलंब केल्याने, अथवा अभिव्यक्तिवैशिष्ट्यामुहे घडते, या बाबीला महत्त्व देऊन उपपत्ती मांडल्या आहेत.
जीवनाकडे खेडकर दृष्टीने बघायला शिकवणारे साहित्यिक, नट, वक्ते, व्यंगचित्रकार लोकांना नेहमी हवेसेच वाटतात. लोकांची आयुष्य सुखकर करण्यात त्यांचा फार मोठा वाटा असतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, हे आजच्या पिढीला परिचित वाटतात.

प्र. के. अत्रे म्हणजे विनोद सम्राट! असे म्हणतात की, सभास्थानी अत्रे आले एवढी कुणी म्हटले तरीच सारे सभागृह खदखदून हसे. पु. ल. देशपांडे आणि तर आपल्या विनोदी साहित्यांनी वाचकांच्या मनात हत्याचे मळे फुलवले आहेत. लोक आपल्या आयुष्यातील दु:खाचा विसर पडावा म्हणून पु.लं. देशपांडेचे साहित्य वाचतात. शिवाय फु.ल. देशपांडे यांच्या विनोदी साहित्याला कारुण्याची झालर असते. त्यामुळे वाचकही अंतर्मुख होतो आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होतो.

मानवी जीवन हे धकाधकीचे आणि सुखदुःखाने भरलेले आहे. अशा या जीवनात विनोदामुळे काही क्षण का होईना हास्य अनुभवायला मिळते. जीवनात सुखापेक्षा दु:खाचे क्षण जास्त असतात. दु:ख आहे त्या तीव्रतेने माणसाला भोगावे लागले, तर तो दु:खाच्या ओझ्याखाली एवढा दबून जाईल की, त्याला जीवनातील उपलब्ध सुख उपभोगताही येणार नाही. अशावेळी विनोदाचे वरदान माणसाचे जीवन सुसह्य करते.

विनोदामुळे कोणाचे मन न दुखवता त्याला त्याचे दोष सांगता येतात. तसेच गुणही सांगता येतात. विनोदामुळे ताणतणाव कमी होतात. तसेच विनोदातून लोकांना शिक्षण सुद्धा देता येते. म्हणून विनोद हा मानवी सुख आणि दु:ख यांच्यात सुवर्णमध्य साधतो.

Vinodache mahatva essay in Marathi language.
‘विनोदाचे महत्व’ हा निबंध कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment